Home

सुस्वागतम ! आपले सहर्ष स्वागत करीत आहे !

Saturday, 4 May 2019

स्टीव्ह जॉब्झ : अधिकृत चरित्र - वॉल्टर आयझॅक्सन मराठी अनुवाद - विलास साळुंके

स्टीव्ह जॉब्झ : अधिकृत चरित्र - वॉल्टर आयझॅक्सन
मराठी अनुवाद - विलास साळुंके
          CLICK
स्टीव्ह जॉब्झच्या संपूर्ण सहकार्यानं वॉल्टर आयझॅक्सननी लिहिलेलं अधिकृत चरित्र. दोन वर्षाच्या कालावधीत घेतलेल्या स्टीव्ह जॉब्झच्या चाळीसहून अधिक मुलाखतींवर आधारित.  त्याचबरोबर शंभरहून अधिक कुटुंबीय, मित्रमंडळी, सल्लागार, प्रतिस्पर्धक आणि सहकारी यांच्याही मुलाखती - असं हे पुस्तक एका उन्मेषपूर्ण व्यावसायिकाच्या सर्जनशील व्यक्तिमत्त्वाच्या जीवनाचा प्रचंड वेगाने वर-खाली होत असलेला ‘रोलरकोस्टर’ आलेख सांगते, ज्याच्या पूर्णत्वाच्या उत्कटतेने आणि महत्त्वाकांक्षेने सहा उद्योगांमध्ये क्रांती आणली : पर्सनल कम्प्यूटर्स, अॅनिमेटेड चित्रपट, संगीत, फोन, टॅब्लेट कम्प्यूटर्स आणि डिजिटल प्रकाशन व्यवसाय.

२१ व्या शतकात कल्पकता आणि तंत्रज्ञानाचा मेळ घालणं अत्यंत महत्त्वाचं आहे, किंबहुना ती काळाची गरज आहे, हे त्यानं ओळखलं आणि म्हणूनच कल्पकतेची भरारी आणि तंत्रज्ञानाची विलक्षण शक्ती यांचा मिलाफ असलेली ‘अॅपल’ नामक कंपनी उभी करून जॉब्झ जणू सृजनशील आणि व्यावहारिक कल्पकतेचं मूर्तिमंत उदाहरणच ठरले. स्टीव्ह जॉब्झनी जरी या पुस्तकासाठी सहकार्य केलं असलं तरी त्यानी त्यातील लिखाणावर कुठल्याही प्रकारे बंधन घातलं नाही. ‘‘ज्यांचा अभिमान वाटू नये अशा कित्येक गोष्टी मी केल्या आहेत. परंतु माझ्या कपाटात दडवून ठेवलेलं असं काहीही नाहीये, जे बाहेर येऊ नये म्हणून मी प्रयत्न करावा,’’ ते सांगतात.

जॉब्झ त्यांच्या सहकाऱ्यांबद्दल, प्रतिस्पर्ध्यांबद्दल मनमोकळेपणाने आणि कधीकधी अगदीच स्पष्टपणे बोलतात. त्याप्रमाणेच त्यांचे मित्र, शत्रू आणि सहकारीसुद्धा त्यांचा झपाटलेपणा, त्यांचे दोष, परिपूर्णतेचा ध्यास, त्यांच्या इच्छा-आकांक्षा, कला, मोहकता आणि त्यांचा नियंत्रणाचा हट्ट, ज्यांनी त्यांच्या व्यवसायाकडे बघण्याच्या दृष्टिकोनाला आकार दिला आणि ज्यातून नाविन्यपूर्ण प्रोडक्ट्सची निर्मिती झाली... यांवर आपली प्रांजळ मतं व्यक्त करतात. ज्याप्रमाणे ‘अॅपल’ची हार्डवेअर आणि सॉफ्टवेअर एका एकसंध यंत्रणेचा अविभाज्य भाग म्हणून जोडलेले असतात, त्याप्रमाणेच जॉब्झचं व्यक्तिमत्त्व, त्यांची उत्कट जिद्द आणि त्यांनी निर्माण केलेली प्रोडक्ट्स हीसुद्धा एका अनन्य संबंधानी जोडलेली असतात. त्यामुळेच त्याचं आयुष्य म्हणजे कल्पकतेच्या, जिद्दीच्या, नेतृत्वाच्या आणि नीतिमूल्यांच्या धड्यांनी भरलेली उद्बोधक आणि सूचनात्मक कहाणी आहे.

No comments:

Post a Comment