*मंगरूळ परिवारातील शिक्षकांशी केलेला संवाद*
स्वातंत्र्य मिळून ७० वर्षे उलटून गेली तरी आजही आमच्याकडे अशी अनेक मुले आहेत, ज्यांची पहिली पिढी शिक्षण प्रवाहात येत आहे. याचे प्रमाण तुलनेनं कितीतरी जास्त आपल्याच परिवारातील एकलव्य आश्रम शाळेत आहे. ज्या संघटनेशी ही शाळा संबंधित आहे, त्या संघटनेचे पूर्णवेळ कार्यकर्ते अशा वंचित मुलांचा शोध घेवून त्यांना या शाळेत प्रवेश दिला जातो. यांपैकी बरीच मुले पुलाखाली राहणारे, अगदी पत्रवळ्या वेचून त्या उष्ट्या अन्नावर पोटाची खळगी भरनारे आहेत. या शाळेतील शिक्षकांना तुलनेने अधिक कष्ट करावे लागतात. अगदी मातृहृदयी राहून काम करावे लागते आणि ते निष्ठेनं करीत आहेत.
आम्हाला ही अशा वंचितांचा, शिक्षणाच्या प्रवाहापासून कोसो दूर असणाऱ्या मुलांचा शोध घेऊन त्यांना शिक्षणाच्या प्रवाहात आणण्यासाठी प्रयत्न करावेच लागतील. स्वेच्छेने शाळेत आलेल्या मुलांना शिकवणे एवढीच मर्यादित जबाबदारी आमची नाही; तर अशा वंचितांचा शोध घेऊन त्यांना शिक्षणाच्या प्रवाहात आणून चांगले शिक्षण द्यावे लागेल. अशा एखाद्या विद्यार्थ्यांसाठी आपण केलेले प्रयत्न आपली success story होऊ शकते. घरी चांगले शैक्षणिक वातावरण असणा-या पालकांची चार दोन मुले शिष्यवृत्ती धारक करण्यापेक्षा हे काम मोठे आहे, असे मी मानतो.सामाजिक जाणिवा जागृत असणा-या संवेदनशील शिक्षकांकडूनच असे काम होऊ शकते.
महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात शिक्षकांनी केलेले असे प्रयत्न आपल्या पर्यंत यासाठीच पोहोचवण्याचा प्रयत्न आहे, की, त्यातून आपल्याला प्रेरणा मिळावी. अशी प्रेरणा घेऊन आपल्या कडून भरीव काम व्हावे, यासाठीच ही खटाटोप..
🙏🙏🙏
- मल्हार माने
शिक्षण विस्तार अधिकारी
बीट मंगरूळ, तालुका तुळजापूर